मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अभिनेता सोनू सूद मदतीसाठी धावून आला. या त्याच्या कामाची सर्वत्र स्तुती होत असताना शिवसेनेच्या मुख्यपत्रातून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यानंतर त्याला आणखीन राजकीय रंग चढल्याने दिवसभर राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू होता. भाजप-मनसेसह कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले आहेत.
संकटकाळात सोनू सूद यांनी परप्रांतीय मजुरांना उदारपणे मदत करून विलक्षण कामगिरी केली. मोठ्या मनाने त्याचा सन्मान करण्याऐवजी शिवसेना त्याच्यावर टीका करत आहेत. शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे.
मजुरांना मूळगावी परत पाठवण्याची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी त्यांनी या पातळीवर जाऊ नये, अशी टीका सत्तेत सहभागी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विटरवरून केली आहे. निरुपम यांनी याआधी अनेक वेळा शिवसेनेशी आघाडी करण्यावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
करोनावरून लक्ष हटवण्यासाठी राजकीय आरोप होत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच राऊत यांच्या बोलण्याला गांभीर्याने न घेण्याची टीका दरेकरांनी केली. भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांना “हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म?’ असा सवाल केला. राज्य सरकारने करायचं काम सोनू सूद यांनी केल्याचे राम कदम म्हणाले.
तसेच मनसेच्या अमेय खोपकर यांनीही टीका करत, मा. संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केले? ज्याने काम केले, त्याचं कौतुक करत मनाचा मोठेपणा दाखवुया, पण तुमच्याकडून रडण्यापलीकडे काय अपेक्षा ठेवणार, अशी बोचरी टीका त्यांनी केली.