मुंबई – कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी चित्रपट निर्माते आणि टिप्स उद्योगाचे सहसंस्थापक रमेश तौरानी यांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयावर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
तसेच या प्रकरणी आरोपी अब्दुल रौफ मर्चंट याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या. जाधव आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपिठाने आणखी एक आरोपी आणि रौफ याचा भाऊ अब्दुल रशिद मर्चंट याला निर्दोष ठरवण्याचा निर्णय रद्द ठरवून त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गुलशन कुमार यांची 1997 साली ऑगस्टमध्ये अंधेरीतील एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांनी गॅंगस्टर आबू सालेम याला गुलशन कुमार यांच्या हत्येची सुपारी दिली होती, असा सरकारी पक्षाचा आरोप होता.
28 एप्रिल 2020 रोजी सत्र न्यालयाने 19 पैकी 18 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. रौफ याला मात्र हत्या, गुन्हेगारी कट, दरोडा आणि शस्त्राशी संबंधित कायद्यांखाली दोषी ठरवण्यात आले होते. त्या निकालाविरोधात रौफ याने आव्हान दिले होते. तर राज्य सरकारने तौरानीच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर रौफ फरार झाला होता. त्याला 2001 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला 2009 सध्ये फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती. पण तो नंतर न्यायालयात शरण आला नव्हता. त्याला 2016 मध्ये पुन्हा अटक करावी लागली होती.
रशिद याची निर्दोष मुक्तता रद्द करून न्यायालयाने त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याने जर न्यालयासमोर आत्मसमर्पण केले नाही तर त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात यावे असे निर्देश उच्च न्यायालयाने सत्र न्यालयाला दिले.