पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रेयसीला फोन करत त्रास देत असल्याच्या कारणावरून कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणार्या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली. संतोष शहाजी राठोड (वय २६, मूळ रा. शिंगोली (तांडा), जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जन्मठेपेसह त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी निकालात नमूद केले आहे.
दामोदर कृष्णा जबल (रा. धारावी, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, कंपनीतील कामगार ठेकेदार अमित जाधव यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. २० ऑगस्ट २०१८ रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे ही घटना घडली. जबल व राठोड हे येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. याठिकाणी जबल हा कामगार तर राठोड हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. कंपनीतील एका तरूणीशी राठोड याचे प्रेमप्रकरण सुरू होते.
या प्रकरणात, राठोडविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर व सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी पंधरा साक्षीदार तपासले. यावेळी, आरोपीची प्रेयसी व प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणात शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर यांनी तपासी अंमलदार म्हणून काम पाहिले.