पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पैशांच्या कारणावरून जावयाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीला खून करताना पाहणाऱ्या त्याच्या दोन्ही मुली आणि नातवाने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्या आधारे वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल गांधी यांनी हा निकाल दिला.
दत्तू बाळू मोहिते (वय ७०, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जावई सुनील जाधव याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यावर त्याच्या मुलीला भरपाई म्हणून देण्यात यावी; तसेच दंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
याबाबत, शुभदा जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना २० ऑगस्ट २०२० रोजी घडली. तपास अधिकारी दिगंबर अतिग्रे यांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी सहा साक्षीदार तपासले.