फलटण – भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे काल (दि. 29) पुणे येथे निधन झाले. त्यापूर्वी सोमवारी (दि. 27) त्यांनी पाठवलेले शुभेच्छापत्र पाहताच आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना हुंदका दाटून आला. मित्र गिरीश बापट यांच्या आठवणीने रामराजे भावूक झाले. त्यांनी व्हॉटस्ऍप स्टेटसद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली.गिरीश बापट व रामराजे यांच्यातील घट्ट मैत्री सर्वश्रुत आहे.
आ. रामराजे यांचा वाढदिवस 8 एप्रिल रोजी आहे. बापट यांनी सोमवारी (दि. 27) रामराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठविले होते. हे पत्र रामराजे यांच्या फलटण येथे लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. बापट यांचे शुभेच्छापत्र रामराजे यांना आज (गुरुवार) मिळाले. या शुभेच्छापत्रातील मजकूर असा आहे की, आपला वाढदिवस दि. 8 एप्रिलला येतो. उगवता सूर्य आपणाला आशीर्वाद देतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, जीवनात आनदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो, जीवन किती सुंदर आहे, हे हळूच कानात सांगून जातो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, देव आपणास उदंड आयुष्य देवो.हे शुभेच्छापत्र पाहताच आपल्याला हुंदका दाटून आल्याचे रामराजे यांनी त्यांच्या व्हॉटस्ऍप स्टेटसद्वारे सांगत, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. रामराजे आपल्या व्हॉटस्ऍप स्टेटसमध्ये रामराजे यांनी म्हटले आहे की, आज आपल्या शुभेच्छांचे पत्र पाहून बापटसाहेब मनामध्ये हुंदका दाटून आला.
आपल्या निधनाची बातमी काल समजताच, खूप धक्का बसला. आपल्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपली भारतीय संस्कृती खूप जुनी आणि त्यामुळेच समृद्ध आहे. आपल्या सभोवतालच्या लोकांच्या सुखदुःखात आपण भारतीय लोक नेहमी सहभागी असतो. एकमेकांच्या सुखात आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि एकमेकांच्या दुःखात आपण एकमेकांना धीर देतो. एकूणच आपण एकमेकांना सांभाळून घेत असतो. आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार…!