संकटमोचक विधिज्ञ काळाच्या पडद्याआड…

प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. आपल्या अंगभूत आणि प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या ज्ञानाच्या कलेच्या जोरावर तो स्वत:चे अस्तित्व समाजामध्ये निर्माण करीत असतो. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणाऱ्या असंख्य माणसांना लौकिक अर्थाने यश मिळविणे कठीण असते. काही अवलिया सातत्यपूर्ण वेगळी भूमिका घेत आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश प्राप्त करतात. मग मात्र तत्कालीन काळाकडे त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो! असेच भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत गेली आठ दशकेच चर्चिले गेलेले नाव म्हणजे जेष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी होय.

वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांनी आपल्या वकिलीस सुरूवात केली. नव्वदी पार केल्यानंतरसुद्धा तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने ते काम करीत राहिले. विधी, समाजकारण, राजकारण, शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले भरीव योगदान दिलेलं आहे. 14 सप्टेंबर 1923 मध्ये शिकारपूर येथे त्यांचा जन्म झाला. तत्कालीन काळामध्ये कायद्याची पदवी पूर्ण करण्यास एकवीस वर्ष लागायची. मात्र, जेठमलानी यांनी ती अठराव्या वर्षीच मिळविली. आपण कायद्याची पदवी पूर्ण केली असून आपल्याला वकिली करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी त्यांनी स्वत: स्वत:ची केस लढून वयाच्या अठराव्या वर्षी वकिली करण्याचा परवाना मिळविला.

आपल्या आठ दशकांच्या कारकीर्दीत अनेक वादग्रस्त आणि हायप्रोफाईल खटल्यात त्यांनी बचाव पक्षाकडून युक्तिवाद केला. ज्यामध्ये नानावटी खटला, केतन पारेख, हर्षद मेहता, लालकृष्ण अडवाणी, अरविंद केजरीवाल, अमित शाह, मनू शर्मा, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे मारेकरी, हाजी मस्तान, जयललिता, लालूप्रसाद यादव, कनीमोळी, सुब्रत रॉय या आणि अशा असंख्य मंडळींचे वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते. यामुळे त्यांना अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले. मात्र आपली बाजू मांडताना ते नेहमी म्हणत, No lawyer shall refuse to defend a person on the ground that he believes him to be guilty or that he is unpopular or that he is believed by many other people to be guilty or a bad person or that it will bring him unpopularity Im subject to bar council rules.

देशातील सर्वाधिक पैसे घेणारे क्रिमिनल लॉयर अशी त्यांची ओळख अखेरपर्यंत कायम होती. मी वकिली करणे थांबविले आहे, अशी आपल्या घराच्या बाहेर पाटी लावूनही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी काही केसेस नव्वदीतही लढल्या!
जेठमलानी यांनी सार्वजनिक आयुष्यात कायम वेगवेगळ्या आणि वादग्रस्त भूमिका घेतल्या. ज्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. मोदींचे पंतप्रधान पदासाठी नाव सुचविण्यात ते अग्रस्थानी होते. मात्र, नंतर त्यांनी मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. अटलजींच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधानांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

भारत अमीर देश हैं, लेकीन राजनेता बताते है की, हम गरीब हैं, ये नेतालोग डाकू है म्हणत त्यांनी काळा पैसा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. अशा या निर्भिड, स्पष्ट, कुशाग्र बुद्धिमत्ता, सडेतोड युक्तिवाद करीत विनोदबुद्धी जपणाऱ्या जागतिक कीर्तीप्राप्त विधिज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)