यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाईट वॉश देत अभूतपूर्व कामगिरी केली. या मालिकेत सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी केली ती जसप्रीत बुमराह या भारतीय वेगवान गोलंदाजाने. दोन कसोटींच्या या मालिकेत बुमराहने अवघ्या 9.23 च्या सरासरीने आणि 22.6 च्या स्ट्राईक रेटने 13 गडी बाद केले. यामध्ये त्याने दोन वेळा 5 गडी बाद केले तर एक हॅट्ट्रिकही मिळवली. कसोटीत हॅट्ट्रिकही मिळवणारा तो भारताचा केवळ तिसरा गोलंदाज आहे. याआधी हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनाच कसोटीत हॅट्ट्रिकही मिळवता आली आहे. या कामगिरीने त्याने आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेंव्हा अनेकांनी त्याच्या विचित्र गोलंदाजी शैलीवरुन त्याला लक्ष्य केले. काहींनी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त क्रिकेट खेळू शकणार नाही अशी भाकितही वर्तवली. त्याच्या विचित्र शैलीमुळे निवड समितीही मर्यादित सामन्यांसाठीच त्याची निवड करीत होती. मात्र त्यात त्याने दाखविलेली चुणूक त्याला कसोटी संघात स्थान मिळवून देणारी ठरली. 58 एकदिवसीय सामन्यात त्याने 103 गडी बाद केले. त्यात 27 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे तर 42 टी-20 सामन्यात त्याने 51 बळी मिळवले. मर्यादित सामन्यात तो आज जगातला सर्वात घातक गोलंदाज समजला जातो. डेथ ओव्हर्समध्ये त्याची सरासरी सर्वोत्तम आहे. आपल्या अचूक गोलंदाजीने त्याने भारताला अनेक विजय मिळवून दिले. काही तथाकथित क्रिकेट पंडित त्याला टी-20 चा गोलंदाज म्हणून खिजवत होते. पण वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत त्याने आपण केवळ टी-20च नव्हे तर कसोटीतही सर्वोत्तम आहोत हे दाखवून दिले आहे. त्याची कसोटी कारकीर्द 21 महिन्यांची आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने प्रचंड यश मिळवले आहे. तो केवळ 12 सामने खेळला आहे. या 12 कसोटी सामन्यात त्याने तब्बल 62 बळी मिळवले आहेत. तेही 19.26 अशा सर्वोत्तम सरासरीने. एका सामन्यात 5 पेक्षा जास्त बळी मिळवण्याची कामगिरी त्याने 5 वेळा केली. 27 धावांत 6 बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. 12 कसोटीत त्याची सर्वोत्तम सरासरी 19.26 आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सर्वोत्तम सरासरी आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस याची सरासरी 19.33 होती दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज ऍलन डोनाल्डची सरासरी 23.21 होती तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली याची सरासरी 24.18 होती हे तीनही गोलंदाज महान आहेत. या गोलंदाजांना मागे टाकण्याची कामगिरी बुमराहने केली आहे. त्याची हीच कामगिरी भविष्यात त्याला महान गोलंदाजांच्या पंक्‍तीत नेऊन बसवेल, यात शंका नाही.

आज तो भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गणला जातो. इन स्विंग, आउट स्विंग, बाऊन्सर, यॉर्कर, स्लोवर वन अशी वेगवान गोलंदाजांना आवश्‍यक सर्व अस्त्रे त्याच्या भात्यात आहेत. 150 किलोमीटर वेगाने सातत्याने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे चेंडूच्या गतीमध्ये बेमालूमपणे बदल करण्याचे कसब आहे. अचूक यॉर्कर टाकण्याची दैवी देणगी त्याला लाभली आहे. याच वैविध्यपूर्ण गोलंदाजीमुळे तो अनेक माजी खेळाडूंच्या गळ्यातील ताईत आहे. सचिन तेंडुलकर तर त्याचे कौतुक करताना थकत नाही. बुमराह हा भारताला मिळालेला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, असे प्रशस्तीपत्र तेंडुलकरने दिले आहे. तर व्हीवीयन रिचर्डस्‌ या वेस्ट इंडिजच्या महान खेळाडूने बुमराह हा डेनिस लिलीपेक्षाही घातक गोलंदाज असल्याचे म्हटले आहे.

बुमराह हा आजघडीचा क्रिकेट विश्‍वातील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे, अशा शब्दात भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले आहे. बुमराहसारखा गोलंदाज संघात असणे हे कर्णधार म्हणून माझे भाग्य आहे, असेही विराट कोहली म्हणतो. विराट कोहलीच नव्हे तर क्रिकेट क्षेत्रातील सर्वच जाणकार बुमराहच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत.जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेट संघाला मिळालेले रत्न आहे. या रत्नाने भारतीय क्रिकेट झळाळून निघत आहे. बुमराह अवघा 25 वर्षाचा आहे तो आणखी किमान बारा वर्ष तरी खेळेल. या बारा वर्षात तो अनेक विक्रम आपल्या नावे करेल आणि भारताला अनेक अशक्‍यप्राय विजय मिळवून देईल, यात शंका नाही.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)