विविधा : राम जेठमलानी

माधव विद्वांस

वकिली पेशातील व्यक्‍तिमत्त्व राम जेठमलानी यांचा आज जन्मदिन. “मला जे पटते ते मी करणार’ हा त्यांचा खाक्‍या होता. त्यांचा जन्म सध्याचे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे 14 सप्टेंबर 1923 रोजी झाला.

लहानपणापासून कुशाग्रबुद्धी असलेले जेठमलानी खास परवानगीने एका वर्षात दोन इयत्तांची परीक्षा देत वयाच्या 13 व्या वर्षीच मॅट्रिक झाले व वयाच्या 17 व्या वर्षी वकिलीची एलएल.बी. परीक्षाही पास झाले. मात्र वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वकिली करता येत नव्हती. अखेर त्यांना शासकीय पातळीवर खास ठराव करून विशेष अपवाद म्हणून त्यांना वयाच्या 17 व्या वर्षीच वकिली करण्याची परवनगी देण्यात आली. 

वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांचा विवाह दुर्गा यांच्याबरोबर झाला तर फाळणीच्या अगोदर त्यांचा दुसरा विवाह पेशाने वकील असलेल्या रत्ना साहनी यांच्याबरोबर झाला. त्यांना पहिल्या पत्नीपासून राणी, शोभा आणि महेश ही तीन मुले व दुसऱ्या पत्नीपासून रत्ना नावाची मुलगी झाली. महेश आणि रत्ना सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.

सुरुवातीस जेठमलानी यांनी ए. के. ब्रोही या वकिलांबरोबर कराची येथे आपल्या करिअरला सुरुवात केली तसेच कराची येथील विधी महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले. फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीवेळी आपल्या मित्राच्या सल्ल्यावरून ते भारतात आले व निर्वासित छावणीत राहिले. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्‍त 10 रुपये होते. जेठमलानी यांनी भारतातील पहिल्या खटल्यात मुंबई शरणार्थींनी कायद्यातील अन्यायकारक तरतुदी विरुद्ध लढा दिला व तो खटला जिंकला. वर्ष 1954 मध्ये ते मुंबईत सरकारी लॉ कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापक बनले.

जेठमलानी यांचे नाव प्रकाशझोतात आले ते वर्ष 1959 मध्ये गाजलेल्या के. एम. नानावटी केसमध्ये. या प्रकरणात नंतर जेठमलानी गुन्हेगारी जगतातील एक यशस्वी वकील ठरले. कालांतराने या खटल्यावर “रुस्तुम’ हा चित्रपट निघाला. “अपराध मीच केला’ हे मधुसुदन कालेलकरांचे नाटकही रंगमंचावर आले. वकीलपत्र घेताना त्यांनी कोणताही विधिनिषेध ठेवला नाही. ते कामात भावनाशून्य असायचे. फक्‍त ज्याच्या बाजूने ते उभे राहायचे तो कसा जिंकेल यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असायचे.

1977 च्या निवडणुकीत ते मुंबईतून जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून गेले. राजकारणात आलेली व्यक्‍ती तडजोडी करायला शिकते. तडजोड केल्याशिवाय माणूस राजकारणात टिकूच शकत नाही. मात्र, जेठमलानींना तडजोडीचे राजकारण माहीत नव्हते. यामुळे तत्कालिन सरकारने जेठमलानी यांचा राजीनामा मागितला.

एका प्रकरणात त्यांच्या युक्‍तिवादाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी वैतागून त्यांना “तुम्ही अखेर कधी निवृत्त होणार?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर त्यांनी आपल्या प्रसिद्ध फटकळ भाषेत, “मी केव्हा मरणार आहे, याची न्यायमूर्ती का चिंता करीत आहेत?’ असा प्रतिप्रश्‍न केला. 8 सप्टेंबर 2019 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.