ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक सामाजिक मुद्दयावर आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करत असते. तिच्या मताची कोणी दखल घेओ अथवा न घेओ, त्याच्याशी राखीला काहीही घेणे देणे नसते. तिच्या मताचा व्हिडीओ पब्लिकने बघावा, एवढीच तिची अपेक्षा असते. चीनमध्ये पसरलेल्या करोना विषाणूच्या साथीवरही राखीने आपले मत व्यक्त केले आहे. हा विषाणू संपवण्याचा आत्मविश्वासही तिने व्यक्त केला आहे. करोना विषाणू संपवण्यासाठी चीनला जात असल्याचे राखीने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
हा व्हिडीओ तिने विमानामध्ये बसली असताना केला आहे. एवढेच नव्हे तर करोना विषाणू संपवण्यासाठी “नासा’ कडून विशेष औषधही मागवले असून या औषधामुळे चीनमधून करोना विषाणू संपून जाईल, असेही तिने म्हटले आहे. विमानातून बाहेर पडतानाचा आणखी एक व्हिडीओ राखीने केला आहे, त्यात चीनमध्ये दाखल झाल्याचे आणि आता करोना लवकरच संपणार असल्याचे तिने म्हटले आहे. पब्लिकने या व्हिडीओवरून राखीला भरपूर ट्रोल केले आहे. अत्यंत गंभीर समस्येबाबत राखीने अशी चेष्ठा मस्करी करायला नको होती, असे पब्लिकने म्हटले आहे.