लखनौ – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीएसने उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे त्या राज्यांत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळून लढती अटळ बनल्या आहेत.
उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाच्या ३ उमेदवारांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ भाजपच्या ७ उमेदवारांनी बुधवारी अर्ज सादर केले.
त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली. मात्र, भाजपच्या ८ व्या उमेदवाराने गुरूवारी अखेरच्या दिवशी रिंगणात उडी घेतली. त्यामुळे भाजप विरूद्ध समाजवादी पक्ष असा मुकाबला रंगणार आहे.
कर्नाटकात ४ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होईल. त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने तिघांना उमेदवारी दिली. भाजपनेही १ उमेदवार दिला. त्यानंतर गुरूवारी अचानकपणे भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीएसनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला.
त्यामुळे ४ जागांसाठी ५ उमेदवारांमध्ये लढत होईल. हिमाचलमधील एकमेव जागेसाठी सत्तारूढ कॉंग्रेसने याआधीच आपला उमेदवार दिला. ती निवडणूक भाजप लढवणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपनेही उमेदवार दिला. त्यामुळे हिमाचलमध्येही निवडणूक होण्याची शक्यता आहे.