बंगळुरू Rajya Sabha Election 2024 –कर्नाटकमधील सत्तारूढ कॉंग्रेसने रिंगणात उतरवलेले तिन्ही उमेदवार राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले. क्रॉस-व्होटिंगचा फटका बसूनही भाजपने १ जागा जिंकली. तर, भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीएसचा उमेदवार पराभूत झाला.
कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार नशीब आजमावत होते. त्या निवडणुकीसाठी विधानसभेतील आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसचे अजय माकन, जी.सी.चंद्रशेखर आणि सैद नासीर हुसेन हे तिन्ही उमेदवार विजयी झाले.
भाजपचे उमेदवार नारायणसा के.भांडगे यांनीही विजय मिळवला. मात्र, जेडीएसचे उमेदवार डी.कुपेंद्र रेड्डी यांना पराभूत व्हावे लागले. भाजपचे आमदार एस.टी.सोमशेखर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माकन यांच्या पारड्यात मत टाकले. तर, भाजपचे आमदार ए.शिवराम हेब्बार मतदानापासून दूर राहिले. त्या दोन आमदारांची कृती भाजपसाठी राजकीय हादरा ठरली.
आता भाजपने त्या आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. मात्र, त्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोन आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभेच्या सभापतींकडे तक्रार दाखल केली जाईल,असे सूतोवाच भाजपकडून करण्यात आले.