वॉशिंग्टन: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातील नौदलाच्या हवाईतळाला भेट दिली, तेथे त्यांनी लढाऊ विमानांचे प्रात्यक्षिकही पाहिले. तसेच त्यांनी विविध जातीच्या लढाऊ विमानांचे निरीक्षणही केले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या समवेत अमेरिकेतील 2 अधिक 2 परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत.
या भेटीच्या संबंधात आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की या भेटीत आपल्याला निमिट्झ क्लास विमानवाहू नौकेवरही जाण्याची संधी मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्य वाढत असून त्याचे प्रतिबींबही या भेटीत जाणवले असे त्यांनी नमूद केले आहे. भारत अमेरिकेकडून विविध जातींची लढाऊ जेट विमाने खरेदी करण्याची शक्यता आहे. राजनाथ यांच्या भेटीने भारताला या व्यवहारात स्वारस्य असल्याचाही संदेश यानिमीत्ताने दिला गेला आहे. भारतीय नौदल आणि भारतीय हवाईदलाच्या गरजेनुसार भारताला विविध प्रकारच्या विमानांचा पुरवठा करण्यास बोईंग कंपनी उत्सुक आहे त्या अनुषंगानेहीं राजनाथसिंह यांनी यावेळी संबंधीतांशी चर्चा करून माहिती घेतली.