वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असलेला महात्मा गांधींचा पुतळा न हटवण्याचा निर्णय कॅलिफोर्निया विद्यापिठाने घेतला आहे. कृष्णवर्णियांनी सुरू केलेल्या “ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी करणारी एक ऑनलाइन यचिका दाखल करण्यात आल्यानंतर हा पुतळा न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिनीयापोलिसमध्ये 25 मार्च रोजी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर फ्रेस्नो येथील कॅलिफोर्निया विद्यापिठातील भारतीय वंशाच्या अखनूर सिंधू या विद्यार्थ्याने ही ऑनलाइन याचिका दाखल केली होती.
जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे देशभर आंदोलनाचा वणवा भडकला आहे. कित्येक ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आणि काही पुतळ्यांचीही तोडफोड झाली. त्या आंदोलनामध्ये वॉशिंग्टन
डी.सी. येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही तोडफोड झाली होती.
फ्रेस्नो पीस गार्डनमध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, सीसर चावेझ आणि जेन ऍदम्स या महान व्यक्तींच्या विधायक कार्याचे स्मरण म्हणून त्यांचे पुतळे उभारण्यात आले होते, असे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष जोसेफ कॅस्ट्रो यांनी सांगितले. या विभुतींच्या प्रतिमा हीच या बागेची शोभा आहे. असे एका निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हा पुतळा हटवला जाऊ नये, यासाठी देखील एक ऑनलाइन याचिका दाखल झाली आहे. नागरी हक्क, अहिंसा, सहिष्णूता आणि शांतता या तत्वांना या पुतळ्यांमुळेच अस्तित्व आहे, असे डेव्हिड रिचर्डसन या व्यक्तीने याचिकेत म्हटले आहे.