कल्याणी,(पश्चिम बंगाल): पश्चिम बंगाल मधील चोवीस परगणा जिल्ह्यात भारत-बांगला सीमेवर एका इसमाकडून सीमा सुरक्षा दलाने 34 हजार डॉलर्सचे परकीय चलन जप्त केले आहे. भारतीय चलनात याची किंमत 24 लाख रूपये इतकी आहे. सीमा भागातील हकीमपुर येथे राहणाऱ्या जाकीर होसैन गाझी नावाच्या इसमाला संशयास्पदरित्या फिरताना अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे हे चलन आढळून आले. त्याने आपल्या पायाला आणि शरीराच्या अन्य भागात या नोटांची बंडले लपवून ठेवली होती. हे परकीय चलन त्याने कोठून आणले आणि त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता याची चौकशी सुरू आहे. अजून मात्र त्याचा तपशील मिळालेला नाही. हा इसम भारतीय हद्दीतीलच रहिवासी आहे. पण त्याचे सीमेपलिकडे बांगला हद्दीतही येणेजाणे असते अशी माहिती मिळाली आहे.