मुंबई – अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने नुकतीच त्यांच्या घरातून सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याची पोलिस तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी मंगळवारी ऐश्वर्या रजनीकांतची मोलकरीण आणि ड्रायव्हरला अटक केली आहे. तत्पूर्वी, ऐश्वर्याने आपल्या घरातून 3.60 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
ऐश्वर्या ही अभिनेता रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी हिने चालक व्यंकटेशनच्या मदतीने ही चोरी घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ईश्वरीने 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम डायमंड ज्वेलरी आणि 4 किलो चांदी चोरली. हे दागिने विकून तिने स्वत:साठी घर आणि इतर काही वस्तूही खरेदी केल्या होत्या. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ईश्वरी गेल्या 18 वर्षांपासून ऐश्वर्याच्या घरात काम करत होती आणि तिला घराचा प्रत्येक कोपरा माहीत होता. तिने हळुहळु अनेक वेळा दागिने चोरले आहेत. या मोलकरणीच्या घरातून चोरीच्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरातून मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ऐश्वर्याने म्हटले आहे की, तिने शेवटचे दागिने तिची धाकटी बहीण सौंदर्याच्या लग्नात घातले होते. ही गोष्ट 2019 ची आहे. तेव्हापासून दागिने लॉकरमध्येच ठेवले होते.
ऐश्वर्याने आपल्या तक्रारीत मोलकरीण आणि चालकावर संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी कलम 381 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. ऐश्वर्या आणि धनुषने जानेवारी २०२२ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. दोघांना दोन मुले आहेत. 2012 मध्ये आलेल्या ‘तीन’ चित्रपटातून ऐश्वर्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. यात धनुष आणि श्रुती हसन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.