राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर नगरपरिषदेत अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी खेड तालुका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले. तर त्याचवेळी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर काही नगरसेवकांनी काळे झेंडे दाखवून दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असून जमावबंदी आहे. असे असले तरी राजगुरूनगर शहरात शनिवारी (दि 30) नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अपहारावरून वातावरण चांगलेच तापले.
राजगुरूनगर नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांनी 31 मार्च 18 ते 31 मार्च 19 या काळात सुमारे 77 लाख रुपयांचा अपहार केला आहे. ही बाब अंतर्गत लेखा परीक्षणात उघड झाली. त्याबाबत नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली; मात्र गेली काही दिवस याबाबत कारवाई झाली नाही. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भीमशक्ती संघटना यांनी कारवाई करा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता.
दुसरीकडे नगरसेवकही याबाबत आक्रमक झाले असून त्यांनीही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. शुक्रवारी (दि.29) रात्री नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी दोषी कर्मचाऱ्यांची नावे आणि अपहार केलेल्या रकमेसह माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी खेड पोलिसांना पत्र दिले. एकाच दिवसात जलदगतीने होणाऱ्या या घडामोडीमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापल्याचे नागरिकानी अनुभवले.
दरम्यान, नगरपरिषदेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने खेड तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विजय डोळस, रेवण थिगळे, भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, राष्ट्रवादीचे कैलास सांडभोर, वैभव घुमटकर, सुभाष होले यांनी खेड पंचायत समितीसमोरील महात्मा फुले पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. अपहारातील दोषींवर गुन्हा दाखल करावा. त्यांच्याकडून अपहार केलेले पैसे वसूल करावेत अशी मागणी केली. तर नगर परीक्षेच्या बाहेर नुकताच पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आलेले नगरसेवक शंकर राक्षे, सचिन मधवे, राहुल आढारी अमोल सांडभोर आदींनी काळे झेंडे दाखवून परिषदेच्या अधिकाऱ्यां विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.
77 लाख 29 हजार 976 रुपयांचा अपहार
राजगुरूनगर नगर परिषदेच्या 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये नागरिकांनी भरलेला विविध स्वरूपातील कर, मिळकतकर व इतर जमा अशा रोख स्वरूपात जमा झालेले 77 लाख 29 हजार 976 रुपयांचा अपहार झाला आहे. ही रक्कम जमा होऊन नगरपरिषदेच्या बॅंक खात्यात जमा झाली नाही. नगरपरिषदेच्या लेखापरीक्षण अहवालात हा आर्थिक घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नगरपरिषदेत लिपीक, टंकलेखक, वसुली लिपीक आदी पदांवर कार्यरत असलेल्या 7 कर्मचाऱ्यांनी हा अपहार केला आहे. नगरपरिषदेकडून दिलेल्या तक्रारपत्रात अपहारप्रकरणी अमर मारणे, धनश्री राऊत, सुनील भालेराव, आशा पोखरकर, गणेश देव्हरकर, महेश घुमटकर आणि वसुली लिपीक काळूराम नाईकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे.
37 लाख 34 हजार 924 रुपये भरले
अपहारप्रकरणी नगरपरिषदेने नोटीस दिल्यानंतर अमर मारणे यांनी 33 लाख, आशा पोखरकर यांनी 1 लाख 76 हजार, गणेश देव्हरकर यांनी 1 लाख 69 हजार 140, महेश घुमटकर यांनी 89 हजार 784 रुपये अशी एकूण 37 लाख 34 हजार 924 रक्कम परत नगरपरिषदेच्या खात्यात भरली आहे. तर महेश घुमटकर यांनी त्यांच्याकडे दाखवलेल्या रकमेपेक्षा 26 हजार 718 रुपये जास्त भरले आहेत. ही सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तथापी, पोलिसांनी अद्यापपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत.