कोटा – राजस्थानमधील कोटा येथील सरकारी रुग्णालयातील अशी घटना समोर आली आहे ज्याने राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील एमबीएस रूग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा उंदराने डोळा कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे त्या रुग्णाच्या पापण्यांचेही दोन तुकडे झाले आहेत.
राजस्थानच्या कोटामधील एमबीएस रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. स्ट्रोक युनिटमध्ये एक महिला रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. ही महिला गेल्या 40 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. या महिलेला लकवा मारला असल्याने तिच्या मानेखालील शरीराच्या भागांची बिलकुल हालचाल होत नाही. या दरम्यान तिच्या डोळ्याला उंदराने कुरतडे असता तिच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरु झाला त्यानंतर हा प्रकार रुग्णालयातील नर्स व डॉक्टरांच्या लक्षात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी रुग्णलयांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा उघड झाला आहे. मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील डॉ.विजय सरदाना यांनी याप्रकरणी माहिती देण्याचे टाळले.