मुंबईतही राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

अखेर सभेला मिळाली परवानगी 

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर आज परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाडनंतर राज ठाकरे यांची मुंबईत सभा पार पडणार आहे.

येत्या 23 एप्रिल रोजी राज ठाकरे यांची काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात सभा होणार आहे. मनसेने 24 एप्रिलला सभेची परवानगी मागितली होती. मात्र, मनसेला एक दिवस आधी 23 एप्रिलची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर राज ठाकरे यांची तोफ आता मुंबईत धडाडणार आहे. या तोफेच्या तोंडी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा असणार यात शंका नाही.

याआधी, निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली “एक खिडकी यंत्रणा’ आणि मुंबई महापालिका यांच्याकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीसाठी दि. 18 एप्रिल रोजी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नसल्याने महापालिकेकडून परवानगी घ्यावी, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून परत पाठवले, अशी माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली होती.

मुंबईतील शिवडी परिसरात राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेनेकडून 18 तारखेला अर्ज करुन शिवडी परिसरातील चार मैदाने आरक्षित करण्यात आली, असा आरोपही मनसेने केला होता. राज्यातील शेवटच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्यापूर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.