मुंबई – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. काल 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा पडली असून, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसून आलं. पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती.
दरम्यान, आता या सभेवरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. “तुमच्यापेक्षा राज ठाकरे यांच्या सभेला जास्त गर्दी जमते’, अशी खोचक टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. पक्ष फुटला तरी आपला दरारा कायम आहे, आपल्या नावावर आजही गर्दी जमते हे कालच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेने दाखवून दिलं. आणि यावरूनच दीपक केसरकर यांनी निशाणा साधला आहे.
दीपक केसरकर कुटुंबासह शिर्डीला आले होते. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते. पण ते कुणाला चोर म्हणत नाहीत. तुम्हाला टिकवता आलं नाही म्हणजे ते कुणीतरी चोरलं अशा भ्रमात राहू नका’. असं केसरकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे’ असं उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होत. त्यामुळे कालच्या होणाऱ्या या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांची ही सभा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये पार पडली.