मुंबई – बॉलिवूडचे शेहेनशाह बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा फिल्म शूटिंग दरम्यान अपघात झाला. स्वतः बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. या अपघातादरम्यान बिग बी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. हैद्राबाद येथील फिल्म सिटीमध्ये हा अपघात घडला. अपघाताची बातमी समोर येताच फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला.
अमिताभ ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना ही घटना घडली. अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. हैदराबादमध्ये उपचार घेतल्यानंतर बिग बी मुंबईतील त्यांच्या घरी परतले आहेत. या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आल्याचे समजते. अमिताभ बच्चन यांनी स्वतः आपल्या ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे.
काय आहे प्रोजेक्ट के
‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून तो दोन भागात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग लोकांमध्ये सस्पेन्स निर्माण करण्याचे काम करेल, तर दुसऱ्या भागात त्याची पूर्ण कथा उलगडून समोर येणार आहे. चित्रपटात बाहुबली फेम प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे. बिग बी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकरताहेत. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.