मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यासह देशाचं राजकारण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरत हिंदुत्वाचा नारा दिला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष हिंदुत्वाच्या मुद्दावर पुढे सरसावले आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे.
नारायण राणे यांनी राज ठाकरेंची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी होत असलेल्या तुलनेवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राज ठाकरेंची बाळासाहेबांशी तुलना आपण करू शकत नाही. बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करू इच्छित नाही. साहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही डोक्यात आला नाही, असंही राणे यांनी म्हटलं.
दरम्यान भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे कायदेशीर बोलले आहे. त्यामुळे राज्य सरकारला पावलं उचलावी लागतील. कायद्याचं राज्य आहे असं दाखवण्यासाठी अधिकारी दोन तीन ठिकाणी कारवाई करतील. पण भोंगे काढल्यानंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही, अशी टीकाही राणे यांनी राज्य सरकारवर केली.