मुंबई – पंजाब किंग्जचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंचांशी वाद घातला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने 15 सेकंदांचा वेळ संपल्यावरही डीआरएस घेतल्याने बेअरस्टोने त्यावर आक्षेप घेत हा डीआरएस ग्राह्य धरू नये असे पंचांना सांगितले मात्र, पंचांनी हा कौल ग्राह्य धरला.
प्रभूसिमरन सिंगविरुद्धचे पायचितचे अपील पंचांनी फेटाळल्यावर विल्यमसनने गोलंदाज टी. नटराजनशी चर्चा केली व डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत 15 सेकंद पूर्ण झाली होती, त्यामुळे बेअरस्टोने पंचांशी वाद घातला.
दरम्यान, रविवारी झालेल्या या सामन्यात उमरान मलिक व भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांनी केलेल्या जबादारी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला होता आणि हा हैदराबादचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला.