पुणे कॅन्टोन्मेंटच्या दाव्यावर पावसाचे पाणी

पुणे – मान्सूनपूर्व ड्रेनेज तसेच नाल्यांची साफसफाईची कामे शंभर टक्के पूर्ण केली असल्याची वल्गना करणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आरोग्य विभागाचा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला आहे. लष्कर परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालक यांची तारांबळ झाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले आहे.

घोरपडी गावाजवळ असलेल्या वॉर मेमोरियलजवळ तीन ते चार फूट पाणी रस्त्यावर जमा झाले होते. यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाहने चालवावी लागली आणि पायवाटही शोधावी लागली. आरोग्य विभागाने वेळेत साफसफाई न केल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने 2017मध्ये मोरवडा चौक ते हेरिटेज हाऊसपर्यंत नवीन फुटपाथचे काम सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून तयार केले. त्याचप्रमाणे या फूटपाथमधून पावसाचे पाणी जाण्यासाठी मोठे पाइप बसवले, मात्र हे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेल्या पावसामध्ये या पाईपलाईनमधून पाणीच पुढे सरकले नाही. मात्र, त्यानंतर देखील बोर्ड प्रशासनाने या भागात असलेल्या चौकातील पाणी जाण्यासाठी पाइपलाइनचे कामे आवश्‍यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, नागरिकांनी लेखी तक्रार केली होती. तरीदेखील काम केले नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारी वॉर मेमोरियल चौकात पाणी साचले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×