क्विन्सलॅंड – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला क्रिकेट संघाचा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना, शेफाली वर्मा व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी साफ निराशा केली. जेमिमा रॉड्रीक्सने मात्र जबाबदारीने फलंदाजी केली.
भारताचे 4 फलंदाज बाद झाले तेव्हा 16 व्या षटकात भारताच्या खात्यात 131 धावा होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. पंचांनी सातत्याने पाहणी केल्यानंतर अखेर सामना होऊ शकणार नसल्याचे जाहीर केले.
पावसाचा व्यत्यय आला व खेळ थांबला तेव्हा जेमिमा 7 चौकारांसह 49 धावांवर तर रिचा घोष 17 धावांवर खेळत होती. स्मृती मानधनाने 10 चेंडूत 17 धावा केल्या. शेफालीने 18 तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 धावा केल्या. जेमिमाने आपल्या खेळीत टी-20 क्रिकेटमधील एक हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी जेमिमा जागतिक क्रिकेटमधील सर्वात युवा फलंदाज ठरली.
यापूर्वी ही कामगिरी वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरच्या नावावर होती. मिताली राज, मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्यानंतर 1 हजार धावांचा पल्ला पार करणारी जेमिमा भारताची चौथी फलंदाज ठरली.