कारवाईचे अधिकार नसल्याने पालिकाही हतबल : जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
पुणे – अनेक कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. मात्र, “आम्हाला रोज ऑफिसला बोलवतात..आम्हाला अजूनही बायेमेट्रिक हजेरी सुरू आहे. आम्हाला कोणीही सॅनिटायझर्स देत नाहीत. आमच्या ग्रुपने बैठका बोलवतात,’ अशा अनेक तक्रारी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागास केल्या आहेत.
या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे नाव आणि पत्त्यासह या तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींवर निर्णय घेण्याचा अथवा सूचना देण्याचा अधिकार नसल्याने महापालिकेकडून केवळ अशा तक्रारींची दखल घेत त्यांची प्रिंट काढून त्या फाइल बंद ठेवल्या जात आहेत. खासगी कंपन्यांनीही शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम अथवा कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे आवाहन केले आहे. त्याला अनेक आयटी कंपन्या तसेच खासगी कंपन्यांकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. मात्र, अनेक कंपन्यांकडून अजूनही कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले जात आहेत.
त्यातच करोनाबाबतच्या अफवा तसेच भीतीमुळे हे कर्मचारी धास्तावले असून कंपनी प्रशासन ऐकत नसल्याने त्यांनी थेट महापालिका आयुक्त, आरोग्य विभागास ई-मेल पाठवून कंपनीला सूचना देण्याच्या विनंती केली जात आहे. या आजारामुळे आमच्यात भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले आहे.