नवी दिल्ली : आयआरसीटीसीने नवीन वर्षात नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. कारण आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दररोज लाखो लोक तिकिट बुक करतात. अशावेळी अनेकदा ही ई-तिकिट सुविधा देणारी वेबसाइट हँग होते किंवा स्लो होते. त्यामुळे रेल्वे तिकिट बुक करताना प्रवाशांकडून काहीतरी गोंधळ होतो किंवा तिकिट बुक होत नाही. दरम्यान भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अॅप दोन्ही अपग्रेड करत आहे.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही नवीन वेबसाइट आज लाँच होणार आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पीयूष गोयल यांच्या हस्ते ही वेबसाइट लाँच केली जाणार आहे. नवीन वेबसाइटमध्ये जास्त युजर फ्रेंडली फीचर्स असणार आहेत. अनेक बदलांनंतर बुकिंग देखील वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅप अपग्रेड झाल्यानेतर प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि त्रासाशिवाय तिकिट बुक करता येणार आहे. भारतीय रेल्वेने अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे त्यांच्या ई-तिकिट वेबसाइटमध्ये युजर पर्सनलायझेशन आणि फॅसिलिटी वाढवण्यावर काम करत आहे.
आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाइटमध्ये जास्त फीचर्स असतील आणि तिकिट बुकिंग देखील सोप्या पद्धतीने होईल.यामध्ये तिकिट बुकिंग प्रमाणेत जेवणाचे बुकिंग करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. अपग्रेडेशननंतर वेबसाइट हँग होण्याची समस्या उद्भवणार नाहीआता या अपग्रेडेशननंतर वेबसाइटवर अधिक जाहीराती दिसणार असल्याने आयआरसीटीसीला अधिक महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे. या नव्या वेबसाइटवर मिनिटाला 10000 पेक्षा जास्त तिकिट्स बुक होतील, सध्या यावर 7500 तिकिट्स मिनिटाला बुक होत आहेत.
आयआरसीटीसीने एक नवीन पोस्ट पेड पर्याय देखील सुरू केला आहे. या सुविधेअंतर्गत वेबसाइटवर आधी तिकिट बुक करून नंतर पेमेंट करण्याचा पर्याय आहे. यामध्ये प्रवासी तिकिट बुक केल्यानंतर e-payments च्या माध्यमातून 15 दिवसांच्या आतमध्ये कधीही पेमेंट करू शकतात किंवा तिकिट डिलिव्हरीच्या 24 तासांच्या आतमध्ये पेमेंट करता येते.
रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनकडून ई-तिकिट सुविधा दिली जाते. रेल्वेच्या मते, 2014 सालापासून, तिकिट बुकिंगचा अनुभव सुधारण्यासाठी तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांच्या योग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात यावर जोर देण्यात येत आहे.