रात्री 10.45 ते पहाटे 6 संचारबंदी : बाहेरगावी किंवा घरीच करावे लागणार “सेलिब्रेशन’
पुणे/पिंपरी – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत यंदा साधेपणाने केले जाणार आहे. हॉटेल खुले ठेवण्यासाठी रात्री 10.45 वाजेपर्यंतच वेळ दिलेली असल्याने थर्टी फर्स्टचे रात्री 12 वाजता करण्यात येणारे सेलिब्रेशन आता नागरिकांना घरीच करावे लागणार आहे.
दरवर्षी थर्टी फर्स्ट धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यासाठी काही दिवस आधीच त्याची तयारी सुरू होते. पार्टीचे बेत आखले जातात. यंदा करोना संसर्गामुळे हॉटेल्स सुरू ठेवण्यासाठी रात्री 10.45 वाजेपर्यंतच वेळ दिलेली आहे.
त्यामुळे नागरिकांना आता हॉटेलमध्ये रात्री अकरापूर्वी जेवण करता येईल. तर, रात्री 10.45 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी आदेश लागू आहेत. पर्यायाने, नागरिकांना थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करायचे असल्यास ते घरीच करावे लागणार आहे.
हॉटेल व्यावसायिक हिरमुसले…
ग्रामीण पट्ट्यातील शेतावर, बंगल्यावर, रिसॉर्टमध्ये त्यासाठी आधीपासूनच तयारी करण्यात आली आहे. पण, हॉटेलमधील डीजे, ऑर्केस्ट्रा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. करोनामुळे हॉटेल व्यवसाय सध्या अडचणीत आहे. त्यातही सेलिब्रेशनसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.