नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांनी गाजला राहुरीचा हगामा

आयोजकांच्या आग्रहास्तव आ. कर्डिले झाले पंच

राहुरी – राज्यातील नामवंत पैलवानांनी आपल्या कुस्तीतील डावपेचाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या राहुरीच्या कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मुळामाई यात्रेनिमित तालुक्‍यातील तमनर आखाडा येथे भव्य कुस्त्यांच्या हगामा झाला. या हगाम्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांची हजेरी होती. कुस्ती आखाड्याचे पूजन तसेच शेवटची एक नंबरची एक लाख रुपयांचे बक्षिस असलेली कुस्ती आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते लावली गेली. हलगी व डफाच्या दणदणाटामध्ये सायंकाळी कुस्त्यांना सुरुवात झाली. कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांची गर्दी झाली होती.

तमनर आखाडा येथील पैलवान पंढरीनाथ तमनर, रंगनाथ तमनर, छोटू तमनर, बबन तमनर, किरण बाचकर, राहुल तमनर, महेंद्र तमनर यांनी पंच म्हणुन काम पाहिले. 1 लाख रुपये व चांदीची गदा बक्षिस असलेली कुस्ती पुण्याचा मल्ल सम्राट गोकुळ आवारे याने अवघ्या पंधरा मिनिटात चितपट करून उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आग्रहाखातर या कुस्तीचे पंच म्हणून आमदार कर्डीले यांनी काम पाहिले. 71 हजार रुपये बक्षिसाची कुस्ती उंबरे (ता.राहुरी) येथील अनिल ब्राम्हणे याने जिंकली. 51 हजार रूपये बक्षिसाची कुस्ती नगरच्या केवल भिंगारे याने गुणावर जिंकली. तर धर्मा शिंदे हा प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत 41 हजार रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.