कराडात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या

सैदापूर-विद्यानगरमध्ये खळबळ, कौटुंबिक वादाचा संशय 

कराड – विवाहित मुलीने विष प्राशन करून आणि आई-वडिलांनी पंख्याच्या हुकाला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सैदापूर-विद्यानगर (ता. कराड) येथील गुरुदत्त कॉलनीत शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. शिवाजी अनंत मोहिते (वय 59), सौ. बेबी शिवाजी मोहिते (43) आणि वृषाली विकास भोईटे (22) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे गुरुदत्त कॉलनीतील रहिवासी हादरले. या घटनेमागील कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे.

घटनास्थळासह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी मोहिते हे उंब्रजनजीकच्या कोरिवळे येथील मूळचे रहिवासी होते. एस. टी. महामंडळात तो नोकरीस होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. अनेक वर्षांपासून ते विद्यानगरमधील गुरुकृपा कॉलनीत राहत आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यापूर्वीच वाघोली-वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील मुलाशी विवाह झाला होता. सध्या ती आई-वडीलांकडे होती. शुक्रवारी दुपारी सौ. वृषालीने विषारी औषध प्राशन केले. ती घरातील कोचवर निपचीप पडली होती. ती काहीच बोलत नाही. म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिला हलवून पाहिले. मात्र, तीने काहीच प्रतिसाद दिला नाही.

तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्यामुळे वडील शिवाजी मोहिते आणि आई बेबी मोहिते यांनी त्वरीत पुण्यात असलेल्या मुलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्याचवेळी त्यांची रडारड सुरू होती. त्यांचा फोन कट करून मुलाने त्याच्या विद्यानगर येथील मित्रांना घरी जायला सांगितले. ते मित्र घरी पोहचेपर्यंत शिवाजी मोहिते आणि बेबी मोहिते या दांपत्याने सिलींग फॅनच्या हुकाला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या घटनेची माहिती कॉलनीतील रहिवाशांना मिळताच महिला, नागरीकांची गर्दी झाली. याबाबत सागर शिवाजी जाधव (वय 28, रा. प्रकाशनंद कॉलनी, विद्यानगर-सैदापूर, ता. कराड) याने शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यामुळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता मुलगी वृषाली ही कोचवर निपचित पडली होती, तर शिवाजी मोहिते, पत्नी सौ. बेबी मोहिते हे पंख्याच्या हुकाला गळफास घेतलेल्या स्थितीत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.