सम्राट निकमच्या मारेकऱ्याला पुण्यातून अटक

तालुका पोलिसांची कारवाई; खुनाच्या प्रयत्नाचीही दिली कबुली

सातारा – कोडोली, ता. सातारा येथील चौकात मकर संक्रातीच्या दिवशी दिवसाढवळ्या सम्राट निकम (वय 27) या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रे व बेसबॉलच्या लाकडी दांडक्‍याने मारहाण करत निर्घृण खून केल्याप्रकरणी सुमारे तीन महिन्यांनंतर “रावण गॅंगचा’ म्होरक्‍या धीरज शेळके (रा.जकातवाडी, ता. सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. या टोळीला मोका लागला असून संशयित धीरज शेळके हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. दरम्यान, अटकेतील शेळके याने काही दिवसापूर्वी जकातवाडी ता. सातारा येथेही कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.14 जानेवारी रोजी कोडोली येथे साईसम्राट ढाब्याचे मालक विजय निकम यांचा मुलगा सम्राट निकम याचा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील काळोशीकडे जाणाऱ्या मुख्य चौकात खुन करण्यात आला होता. अचानक झालेल्या हल्यात सम्राटला प्रतिकार करता आला नाही. या हल्ल्यात सम्राट गंभीर जखमी झाला व तेथेच रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोरांनी डोक्‍यात व तोंडावर वर्मी घाव केल्याने सम्राट रक्‍ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला होता.

दरम्यान, सम्राटच्या खूनप्रकरणी त्याचे चुलते संजय वसंतराव निकम (वय 51, रा. साई सम्राट हॉटेल पाठीमागे, कोडोली) यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी संशयितांना खंडणी दिली नसल्याने व जुन्या वादाच्या कारणातून खून केल्याच्या आरोपाखाली काही संशयितांना अटक केली होती. मयुर राजेंद्र जाधव (रा.कोडोली), सौरभ खरात उर्फ कुक्‍क्‍या, धिरज शेळके, संग्राम दणाणे (तिघे रा.मल्हार पेठ) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बहुतेक संशयितांची धरपकड झाली. मात्र धीरज शेळके हा पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर धीरज वडूज व पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. संशयीत हा पुण्यातील दिघी येथे मेव्हुण्याच्या घरी राहत असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. त्यानुसार धीरज याला गुरूवारी पुण्यातून ताब्यात घेतले.

अटकेतील शेळके याने दि. 25 डिसेंबर 2018 रोजी जकातवाडी येथे दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या रागातून जयेश सावंत या तरूणावर कोयत्याने वार केले होते. हा हल्ला धीरज व त्याचे साथीदार रोहित जाधव व दोन अल्पवयीन मुले यांनी मिळुन केला होता. याप्रकरणात धीरज याच्यासोबत त्याचा मित्र रोहीत सुरेश निंबाळकर यालाही पोलीसांनी अटक केली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या सुचननुसार पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते, पोलीस हवालदार दादा परिहार, राहूल शिंदे, सुजीत भोसले, उत्तम कोळी, रमेश चव्हाण यांनी सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.