बंगळूर – कॉंग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे राहुल गांधी यांनी शक्य तितक्या लवकर स्वीकारावीत, अशी भूमिका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी मांडली. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीचे कारण दिले.
कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन मी याआधीच राहुल यांना केले आहे. सोनिया पक्षाची धुरा सांभाळण्यास समर्थ आहेत. मात्र, त्यांची प्रकृती सध्या ठीक नाही, असे सिद्धरामय्या येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याने राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनियांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा बनवण्यात आले. मागील काही काळापासून पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याच्या पक्षांतर्गत मागणीने जोर धरला आहे.
तसेच, पक्षांतर्गत धुसफूसही वाढीला लागल्याचे चित्र आहे. त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच होणार आहे. त्या बैठकीत नव्या अध्यक्षाच्या निवडीचे वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर, सिद्धरामय्या यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्व आहे.