मुंबई – लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पक्षांनी पुकारलेल्या “महाराष्ट्र बंद’ला काही ठिकाणी कडकडीत, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळला. मात्र काही ठिकाणी बंदला गालबोट लागल्याचे प्रकार घडले. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र बंदवर विरोधकांनी आक्षेप घेत राज्य सरकारवर टीका केली.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनावर कॉंग्रेस नेत्यांकडून मौन व्रत आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, यशोमती ठाकूर यांच्यासह कॉंग्रेस नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला आजच्या बंद बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रत्युत्तर कॉंग्रेस नेत्यांनी दिले.
महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. मुंबईत खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादीकडून हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र बंदचे परिणाम सकाळपासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या अगदीच नगण्य होती. भाजी मार्केट वगळता इतरत्र तुरळक गर्दी दिसत होती. नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील दुकाने, मॉल बंद होती. तर नवी मुंबई महापालिकेने परिवहन सेवाही बंद केली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून कडकडीत बंद पाळला.
नवी मुंबईची एपीएमसी बाजारपेठ आज बंद होती. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही बंदमध्ये सहभागी होत पाठिंबा दर्शविला. याशिवाय नाशिक लासलगाव, धुळे, नंदुरबार, मनमाड बाजार समितीने बंद असल्याने बाजारपेठेत सुकसुकाट होता. त्याचवेळी राज्यात अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही.
भुसावळमध्ये हाणामारी
भुसावळ तालुक्यातील वरणगावात या बंदला गालबोट लागले. वरणगावमध्ये दुकान बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि बराच वेळ दहशतीचे वातावरण होते. पण पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मोठा गदारोळ टाळला. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्येही बंदवेळी वादावादीचे तुरळक प्रकार घडले.