नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक कित्येकदा ‘पप्पू’ म्हणत, सोशल मीडियावर ट्रोल करतात. यावरच राहुल गांधींनी सडेतोड उत्तर दिले आहे. मला या नावाविषयी काहीच अडचण नाही. पूर्वी माझ्या आजीला इंदिरा गांधीसुद्धा ‘गुंगी गुडिया’ म्हटलं जायचं आणि आज त्यांनाच ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते, असे म्हटले आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी,”राजकारणात एकमेकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारणं हा प्रचाराचा भाग आहे. आज जे मला पप्पू म्हणतात ते खरं तर मला आतून घाबरतात. ते नाराज आहेत. मला कोणत्याही नावानं हाक मारायला हरकत नाही. मी त्या नावाचं स्वागतच करिन.” असे म्हटले आहे.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “माझी आजी (इंदिरा गांधी) यांना राजकीय वर्तुळात गूंगी गुडिया म्हणून हिणवलं जायचं. पण आता त्यांना आयर्न लेडी म्हणून संबोधलं जातं.” त्यासोबतच “हे तेच लोक आहेत, जे मला आज 24 तास, सातही दिवस पप्पू म्हणून हिणवतात. मला या नावानं काहीच अडचण नाही.”असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचली होती. त्यानंतर आता सध्या यात्रेत 9 दिवसांचा ब्रेक आहे. तर, 3 जानेवारीला ती पुन्हा कश्मिरी गेटपासून सुरू होईल आणि प्रवास पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तीही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.