नवी दिल्ली : करोना पुन्हा एकदा देशात आपले हातपाय पसरत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 188 करोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन करोना रुग्ण आढळल्यानंतर, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,468 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 141 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,43,483 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 91.01 कोटी करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, गेल्या 24 तासांत 1,34,995 चाचण्या झाल्या. त्याचवेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लोकांना एकूण 220.07 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.
ज्यामध्ये 95.12 कोटी दुसरा डोस आणि 22.38 कोटी सावधगिरीचा डोस देण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, देशभरात गेल्या 24 तासांत करोना लसींचे 90,529 डोस लोकांना देण्यात आले आहेत.
करोना संसर्गाची भीती सर्वत्र असताना दिलासा देणारी बाब म्हणजे देशात करोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.8% आहे. तर देशातील सक्रीय रूग्णांची संख्या 3,468 आहे. ही संख्या एकूण प्रकरणांच्या 0.01% आहे. तर, दिवसाला कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांचा रेट 0.14% आहे आणि साप्ताहिक कोविड पॉझिटीव्ह रेट 0.18% आहे.