नवी दिल्ली – संसद सदस्यत्व रद्द केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना एका व्हिडिओद्वारे टोला लगावला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- शहजादे का सम्मान हो… भले ही जनता का अपमान हो. भाजपच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल यांची पंतप्रधान मोदींवरील विधाने आणि त्यांचे संसद सदस्यत्व रद्द होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
व्हिडिओ सुरू होताच, “बा अदब, बामुलाहिजा, होशियार, पेश है खिदमत है शहजादे” असा आवाज ऐकू येतो. त्यानंतर त्यातील प्रमुख पात्र रस्त्यावरून चालू लागते. यावेळी ते पंतप्रधानांबाबत वक्तव्य करत असलयाचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. शेवटी शब्दांची मर्यादा ओलांडल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून या पात्राची खासदारकी जाते असं अनिमेशन स्वरूपात या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
तसेच व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, कोर्ट त्यांना त्याच्या वक्तव्यावर माफी मागण्यास सांगत आहे, पण ती व्यक्ती कागद फाडून टाकते.त्यानंतर न्यायालय या व्यक्तीवर कारवाई करते असे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला शेहजादे द्राक्ष खाताना दाखवण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर राहुल यांच्यासोबत फिरताना दिसत आहेत.
शहजादे का सम्मान हो,
भले ही जनता का अपमान हो… pic.twitter.com/xbkrNS6PLl— BJP (@BJP4India) March 28, 2023
भाजपच्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.भाजपने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वसामान्यांसह काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते देखील या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.