नवी दिल्ली – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याला चोवीस तास पूर्ण होताहेत तोच राहुल गांधींचे संसद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस आज सर्व राज्य आणि जिल्हा मुख्यालयात महात्मा गांधी पुतळ्यांसमोर सत्याग्रह करणार आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधीवर काँग्रेसतर्फे आज सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. राहुल गांधी राजघट येथे येत महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेत आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, अनेक ठिकाणी काँग्रेस मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली असून, राज्यतील अनेक भागांमध्ये आंदोल करण्यात येत आहे.
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते,सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे? त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याने दावा केला की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.