“आर.आर. आबा’नंतर आदर्श गृहमंत्री म्हणून ‘देशमुखां’कडे पाहिलं गेलं, पण…”

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनिल देशमुख यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाचे कौतुक करताना भाजपवर कडाडून टीका केली. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, गृहमंत्री अनिल देशमुखांनी  इतके वर्षे राजकीय कारकीर्द सांभाळली, ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबानंतर अर्थात आर.आर. पाटील यांच्यानंतर देशमुख यांच्याकडे पाहिले गेले. मात्र भाजपच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. हे अत्यंत वेदनादायी असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.


राज्यत घडलेलं सचिन वाझे प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे देशमुख अडचणीत आले होते. त्यातच न्यायालयाने देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला आदेश दिले आहे. त्यामुळे नैतिकेतेचे कारण देत देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.