सुपा -परप्रांतीयांनी आपल्या गावाकडे जाण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सुपा आरोग्य केंद्रावर तपासणी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
करोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार एमआयडीसीसह सुपा परीसरातील गावांत आडकून पडले होते. परंतु शासनाने या परप्रांतीयांना आपआपल्या गावी जाण्यासाठी काही शर्तींच्या आधारे गावाकडे जाण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी त्यांना ज्या गावात ते राहात आहेत, त्या ग्रामपंचायतीत नाव नोंदणी करून जवळील आरोग्य केंद्रात तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट देण्यास सांगण्यात आले.
त्यामुळे रुईछत्रपती येथील आरोग्य केंद्र व त्या आंतर्गतच्या चार उपकेंद्रांनी आज आखेर दोन हजार 274 नागरिकांची तपासणी करुन त्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिले आहे. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपासणी केंद्राला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. अश्विनी गुंजाळ, डॉ. विद्या बारवकर, डॉ. अंजली वर्पे, सीमा भुसारे, आरोग्य सेवक विजय भोईर, दीपक गोधडे, उज्ज्वला बढे, संजय साठे हे नागरिकांची तपासणी करत आहेत.