मंचर -पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या योगदानातून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर नाकाबंदी केली आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना समज दिली जात आहे, तसेच गावात फिरणाऱ्या मनोरुग्णांनाही त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस पाटील बबूशा वाघ यांनी दिली आहे.
पिंपळगाव-खडकी येथे शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना धान्य, इतर नागरिकांना सॅनिटायझर, साबण, भाजीपाला आदींचे वाटप केले आहे. गावात जंतूनाशक फवारणी केली जात आहे, अशी माहिती सरपंच अश्विनी बांगर यांनी दिली. नागरिकांच्या तपासणीसाठी ग्रामपंचायतीने दोन इन्फ्रारेड थर्मामीटर खरेदी केले आहेत. जिल्हा परिषदच्या वतीने गावातील 58 अपंग नागरिकांना, सुमारे 200 गरजू कुटुंबांना किराणा पुरविला आहे, असे अनिल पोखरकर पाटील यांनी सांगितले.