पुणे -हडपसर, मांजरीसह उपनगरांतील काही भागांत “कोयता गॅंग’ने धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हेगार रात्री-अपरात्री कोयता दाखवून चोरी, वाहनांची तोडफोड, लुटमार करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ मोक्का लावा; तडिपार करा, अशी मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयत्या गॅंगच्या मुद्दा विधानसभेत मांडला. यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या टोळीवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हडपसर, मांजरी भागात “कोयता गॅंग’ला वैतागून ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. ही टोळी रात्री-अपरात्री रस्त्यांवर कोयते फिरवते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमार, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कृत्य करते. हे प्रकार गंभीर आहेत. पुण्यासह अनेक शहरांत असे प्रकार सुरू आहेत. यावर विरोधी पक्षनेते पवार यांनी मंगळवारी स्थगन प्रस्ताव मांडला. दरम्यान, पवार यांच्या प्रश्नानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी हडपसर पोलिसांनी या भागात पोलीस परेड केली. शिवाय, गस्तीपथक तैनात केले आहे.
पोलीस म्हणतात, “कोयता गॅंग अस्तित्वात नाही’
-पोलिसांच्या माहितीनुसार “कोयता गॅंग’ अस्तित्वातच नाही. कोयत्याचा वापर करुन लुटमार आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना मागील काही दिवसांत अटक करण्यात आली आहे. हे प्रकार सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतात. मात्र, हडपसर पोलिसांनाच “टार्गेट’ का केले जात आहे? यामागचे कारणही शोधले जाणार आहे.
“एसपीओं’चा “पोरखेळ’
कोयता गॅंगच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांनी स्थानिक तरुणांना “पोरखेळ’ अर्थात विशेष पोलीस म्हणून गस्त घालण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मिशाही न फुटलेल्या किशोरवयीन मुलांच्या हातात काठ्या दिल्या आहेत. या तरुणांना गस्त घालताना कोणतेही गांर्भीर्य नाही. पोलिसांनी या मुलांच्या हाती काठ्या दिल्याने तसेच कोणाचीही चौकशी करण्याचे अधिकार दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.