पुणे/कोथरूड -महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 65 व्या “महाराष्ट्र केसरी’साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली आहे. सुमारे 30 एकर जागेवर कुस्तीचा आखाडा भरणार आहे. या मैदानाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 20) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुदळ मारून झाले. “महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार येत्या 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. ही माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंह, काकासाहेब पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे, नवनाथ घुले, मेघराज कटके, दत्ता गायकवाड, संजय शेटे यासह पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन 10 जानेवारीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची उपस्थित होईल. तर समारोप आणि बक्षीस वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या उपस्थित राहणार आहेत.
“कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून “महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. भव्य दिव्य स्वरुपात ही कुस्ती स्पर्धा होणार असून, माती व गादी विभागाचे आखाडे, 70 हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था येथे करण्यात आली आहे. – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, पुणे