गॉड सेव्ह द क्वीनच्या ऐवजी गॉड सेव्ह द किंग असे शब्द येणार
लंडन : ब्रिटनच्या सम्राज्ञी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे ब्रिटनमधील अनेक राजेशाही संदर्भ आता बदलणार आहे. राणी एलिझाबेथ यांचे वारसदार चार्ल्स आता किंग होणार असल्याने ब्रिटनच्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा अनुषंगिक बदल करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत ब्रिटनच्या राष्ट्रगीता मध्ये गॉड सेव्ह द क्वीन असे शब्द होते.
आता गॉड सेव्ह द किंग अशा प्रकारची शब्दरचना या राष्ट्रगीतामध्ये करावी लागणार आहे. 70 वर्षांच्या खंडानंतर ब्रिटनला पुन्हा एकदा राजा मिळाला आहे. ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स हे चार्ल्स तृतीय या नावाने ओळखले जाणार आहेत. राजाचा राज्याभिषेक झाल्यावर त्यांना जो राजमुकुट परिधान करण्यात येतो त्याचे वजन तब्बल सव्वा दोन किलो असून तो संपूर्ण सोन्याने तयार करण्यात आला आहे.
नऊशे वर्षापासून नव्या राजाचा राज्याभिषेक वेस्टमिनिस्टर ऍबे येथे करण्याचा प्रघात आहे. चार्ल्स तृतीय हे ब्रिटनचे चाळीसावे सम्राट ठरणार आहेत. चार्ल्स यांचे आयुष्य नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी डायना नावाचा 19 वर्षीय तरूणीशी विवाह केला होता त्यांचा हा विवाह नेहमीच वादग्रस्त ठरला.
विवाहापूर्वी त्यांचे कॅमिला पारकर नावाच्या महिलेबरोबर प्रेमसंबंध होते पण तिचा विवाह झाला असल्याने त्यांचे लग्न होऊ शकत नव्हते पण लेडी डायनाच्या अपघाती निधनानंतर चार्ल्स यांनी हे संबंध पुन्हा प्रस्थापित केले 2005 मध्ये त्यांनी तिच्याबरोबर विवाह केला. राजघराण्यानेही या विवाहाला मान्यता दिली चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर कॅमिला यांना डचेस असा दर्जा मिळणार आहे.
.