मुंबई : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किशोरी पेडणेकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, या व्हिडीओनंतर किशोरी पेडणेकर भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022
मुंबईतील बडा कब्रस्तान येथे याकूब मेमनची कबर आहे. या कबरीची सजावट केल्याचे समोर आले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किशोर पेडणेकर आणि रऊफ मेमनसोबतच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी किशोरी पेडणेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न केला आहे.