बारामती (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर येथील रिक्षाचालकाला करोना झाल्याचे रविवारी (दि. 29) स्पष्ट झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रशासनानेही उपायोजनांसाठी कंबर कसली आहे. या रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेल्या 83 जणांना क्वारंटाइन केले आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासू, दोन मुले तसेच एका सोसायटीतील त्याचे तीन नातेवाईक यांच्यासह सात जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट सोमवारी संध्याकाळी येणार असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णासह त्याच्या नातेवाईकांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती नायडू रुग्णालयातून मिळाली आहे. त्यामुळे बारामतीकरांनी घाबरू जावू नये व घरात बसून “करोना’ला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करा, असे आवाहन दैनिक “प्रभात’च्यावतीने बारामतीकरांना करण्यात आले आहे.
“करोना’चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण “लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊ या. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत; मात्र या परिस्थितीत कोणत्याही अफवेला बळी पडू नका. नेहमीप्रमाणे एकसंघपणे या संकटाचा मुकाबला करू या. राज्य सरकार आणि प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.