सावत्र चुलता-चुलतीने केला पुतण्याचा खून

न्यायालयाने आरोपीस दिली पोलीस कोठडी

संगमनेर
– शेतातील वीस गुंठे शेतजमीन विकल्याच्या रागातून सावत्र चुलता व चुलतीने पुतण्यास बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पुतण्याचे रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. याबाबत मयताच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे.

संदीप रमेश ठोंबरे (वय 35, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरणे शिवारात असलेल्या शेतजमिनीच्या हिश्‍श्‍यावरून दोन कुटुंबांत वाद आहेत. 24 जून रोजी सासरे रमेश ठोंबरे यांनी त्यांच्या हिश्‍श्‍यातील वीसगुंठे जमीन अहिल्यू व देवराम जगनर यांना विकली. त्याचा रमेश ठोंबरे यांचे सावत्र बंधू भाऊसाहेब ठोंबरे यांना राग होता. त्याने त्यामुळे त्याने रमेश ठोंबरे यांच्या कुटुंबातील एकेकाला संपविण्याची धमकी दिली होती. 25 जून रोजी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास संदीप यांच्या ओरडण्याच्या आवाजाने हे कुटुंब त्यांच्या मदतीला धावले असता, त्यांना घराजवळील रस्त्यावर भाऊसाहेब व त्याची पत्नी लक्ष्मीबाई संदीपला मारहाण करताना दिसले.

मारहाणीत जखमी झालेल्या संदीप यांना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात व नंतर 28 जून रोजी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना, सोमवारी (दि. 1) त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रुपाली ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुध्द मारहाण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काल (दि. 1) रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी भाऊसाहेब विठ्ठल ठोंबरे (वय 43) याला पोलिसांनी अटक केली. त्याला आज संगमनेरच्या न्यायालयात हजर केले असता, 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.