अमरावती – जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे 1 लाख 60 हजार 206 हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्राचे जमीन, सिंचनपद्धती व इतर वैशिष्ट्ये लक्षात घेता कृषी योजनांची अधिक परिणामकारकता साधण्यासाठी खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, असे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम 2022 नियोजन सभा नियोजनभवनात झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, खारपाणपट्ट्यात जिल्ह्यातील मोठे क्षेत्र व तेथील वैशिष्ट्ये लक्षात घेऊन पुढील वर्षापासून स्वतंत्र नियोजन करावे. खारपाणपट्ट्याबाबत 2014मध्ये स्वतंत्र प्रस्ताव केला होता. तो तपासून आवश्यक त्या नव्या नोंदीसह सादर करावा. खारपाणपट्ट्यासाठी संरक्षित सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेततळे मोहिम व्यापकपणे राबवावी.
जिल्ह्यात कृषी विकास समित्या, तसेच “पोकरा’अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या कार्यान्वित कराव्यात. सदस्यांचे प्रशिक्षण घ्यावे. ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांनी समन्वयाने आठवड्यातून एक दिवस शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणींचे निराकरण केले पाहिजे. हा उपक्रम नियमितपणे राबवावा.
पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होऊ नये. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.