मॉस्को – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले असून त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे अशी माहिती काहीं स्त्रोतातून बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर ते सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुसेव्ह यांच्याकडे तात्पुरते अधिकार सोपवण्याची शक्यता आहे अशी आता चर्चा रंगु लागली आहे.
पुतीन यांची सखोल तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज व्यक्त केली आहे. न्यूयॉर्क पोस्टने माजी रशियन फॉरेन इंटेलिजेंस सर्व्हिस लेफ्टनंट जनरलद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम चॅनेलचा हवाला देऊन ही बातमी दिली आहे.
या शस्त्रक्रियेमुळ थोड्या काळासाठी पुतीन हे शारीरीकदृष्ट्या कमजोर असतील आणि काम करण्यास असमर्थ असतील असे अहवालात म्हटले आहे. रशियन अध्यक्ष कर्करोग आणि पार्किन्सन रोगासह इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याची अफवाही सध्या पसरली आहे. तथापि, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, अशा मीडिया रिपोर्टसची पडताळणी होऊ शकत नाही.
काही दिवसांपूर्वी, पुतिन यांनी निकोलाई पात्रुशेव यांच्याशी दोन तासांचे थेट व्यक्तिगत संभाषण केले होते, असे टेलिग्राम पोस्टचा हवाला देऊन एका वृत्तात म्हटले आहे. पुतीन हे ज्या पात्रुशेव नावाच्या अधिकाऱ्याकडे रशियाचा कारभार सोपवण्याची शक्यता आहे, ते पुतीन पेक्षा घातक आहेत असे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे. ते राजकीयदृष्ट्या चाणाक्ष आणि धुर्त आहेत पण त्याही पेक्षा ते अधिक आक्रमक आहेत.
रशियाच्या जनतेला त्यांच्यापासून अधिक त्रास होऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे. एका अमेरिकन निरीक्षकाने तर पात्रुशेव हे पुतीन यांच्या पेक्षा अधिक कपटी आहेत असे निरीक्षण नोंदवले आहे. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेत त्यांनी काम केले आहे.