नवी दिल्ली – उत्तराखंड विधीमंडळ पक्ष नेते पदी पुषकरसिंह धामी यांची शनिवारी निवड करण्यात आली. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील हे स्पष्ट झाले.
उधमसिंगनगर जिल्ह्यातील खतिमा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले खामी तिर्थसिंह रावत यांची जागा घेतील. राज्य विधानसभेत त्यांच्या निवडूवरून वैधानिक वाद निर्माण झाल्याने त्यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला होता.
धामी यांनी खतिमा मतदारसंघातून पहिल्यांदा 2012मध्ये आणि पुन्हा 2017 मध्ये विजय मिळवला होता. ते सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांमध्ये ते 33 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून उत्तर प्रदेशातील अवध प्रांतात काम केले होते. 2002 ते 2008 या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तराखंडचे अध्यक्ष होते.
सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल असणाऱ्या आणि तत्कालीन उत्तराखंडचे मुख्यमंत्री असणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांचे 2001-02 या काळात ते विशेष कार्यअधिकारी म्हणून काम पहात होते. नागरिक देखरेख समितीचेही ते उपाध्यक्ष होते. (राज्यमंत्री पदाचा दर्जा)
धामी हे तरूण आणि क्रियाशील नेते आहेत. मात्र अल्पावधीत पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.धामी हे ठाकूर समजातील आणि पर्वतीय क्षेत्रातील आहेत. त्यांची निवड करून पक्षाने जातीय आणि प्रादेशिक समतोल पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साधला असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
उत्तराखमडची समिकरणे
उत्तराखंडमध्ये कुमान विरूध्द गढवाल, ठाकूर विरूध्द ब्राह्मण, आणि पर्वतीय विरूध्द पठार अशा पध्दतीने मतांचे विभाजन होत असते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हे हरिद्वार या पठारावरील प्रदेशातील ब्राह्मण समाजातील आहेत. तर पायउतार झालेले तिर्थसिंह रावल हे ठाकूर समाजातील होते मात्र ते गढवाल या पाठारी प्रदेशातील होते.