नवी दिल्ली – चीनने जगातील पहिली स्काय ट्रेन सुरू केली आहे. चीनच्या या स्काय ट्रेनचा वेग 120 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या स्काय ट्रेनचे वैशिष्ट्य हे आहे की ही जमिनीवरून नाही तर हवेत तरंगत किंवा लटकत चालते.
या ट्रेनला काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत ज्यामुळे प्रवाशांना बाहेरील नयनरम्य दृश्य पाहता येणार आहे. चीनचे सरकारी न्यूज चॅनेल असलेल्या सीटीजीएन न्यूजने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
नव्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या ट्रेन सेवेचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. ही ट्रेन जमिनीवर चालणार नाही किंवा एखाद्या पुलावरूनही धावणार नाही. ही ट्रेन हवेत लटकत प्रवास करणार आहे तोही ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने. या स्काय ट्रेनचे काचांचे कोच आणि वेग प्रवाशांची पहिली पसंद बनणार आहेत कारण वेगाने धावणारी ही ट्रेन एखाद्या टॉय ट्रेनसारखीच दिसते.
स्काय ट्रेन वीजेवर चालणार नाही तर ही ट्रेन बॅटरीवर धावणार आहे. मेट्रो आणि बुलेट ट्रेनपेक्षा ही स्काय ट्रेन पूर्णपणे वेगळी आहे. ही ट्रेन पर्यटन स्थळांना जोडण्याचे काम करेल. याशिवाय चीनमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणूनदेखील तिचा वापर होणार आहे.
सीजीटीएन न्यूजनुसार ट्रेनला झोंगटांग एअर रेल टेक्नॉलॉजीने विकसित केले आहे. ही स्काय ट्रेन पर्यावरण पूरक देखील असणार आहे.