सातारा -करोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्कर हॉल येथे 82 बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आणि ते जिल्हा प्रशासनाला विनामूल्य हस्तांतरित करण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाकडून या सेंटरसाठी डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आदी वैद्यकीय यंत्रणाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हे सेंटर बंद होते. करोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि त्यांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत.
त्यामुळे पुष्कर कोविड केअर सेंटरचा रुग्णांवर उपचार होण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाची वाट न पाहता जे कोणी हे सेंटर चालवेल त्याला विनामुल्य सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंगलमूर्ती हॉस्पिटलने हे सेंटर चालवण्यास घेतले असून उद्यापासून (दि. 24) या सेंटरमध्ये रुग्णसेवा सुरु होणार आहे.
महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉलमध्ये स्वखर्चाने 82 बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारले आहे.
या सेंटरमध्ये 42 बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत 40 बेड विनाऑक्सिजनयुक्त आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे विनामूल्य हस्तांतरीत करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने हे सेंटर जिल्हा रुग्णालयामार्फत चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्यापही जिल्हा रुग्णालयाकडून या सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाली नाही.
त्यामुळे हे सेंटर विनावापर पडून होते आणि गरजू रुग्णांना त्याचा उपयोगही होत नव्हता. पुष्कर कोविड केअर सेंटर चालू करण्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र, वैद्यकीय अधिकारी, नर्स, वार्डबॉय आदी स्टाफ उपलब्ध नसल्याने सेंटर चालू होऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत होते.
काळाची गरज पाहता रुग्णांवर उपचार होण्यासाठी हे सेंटर तातडीने सुरु होणे आवश्यक होते. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णसेवेसाठी सेंटर सुरु करण्याचे आवाहन केले. त्याला मंगलमूर्ती हॉस्पिटलचे संचालक डॉ. जयदीप चव्हाण यांनी होकार दिला. त्यामुळे आता हे सेंटर मंगलमूर्ती हॉस्पिटलमार्फत चालवण्यात येणार आहे.